चिपळूण तहसीलदारांच्या चालकाला नगर परिषदेकडून पगार
चिपळूण : येथील तहसीलदार यांचे शासकीय वाहन चालविण्यासाठी अपेक्षित कायमस्वरूपी वाहन चालक उपलब्ध नसल्याने चिपळूण नगर परिषेतील वाहन विभागाचा ठेकेदारीवरील चालक गेले काही महिने सेवा देत आहे. त्याचे मानधनही चिपळूण न.प.च्या वाहन विभागाकडून दिले जात असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयातील वाहनावर चालक नसल्याने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तहसीलदारांच्या वाहनासाठी चिपळूण न.प.कडून चालक पुरविला असल्याचे सांगितले जाते. गेले तीन ते चार महिने चिपळूण न.प.च्या वाहन विभागातून खासगी ठेकेदारामार्फत सेवातत्त्वावर पुरविण्यात आलेल्या एका चालकाची सेवा तहसीलदार कार्यालयातील वाहनावर सुरू असल्याची बाब उघड झाली आहे. संबंधित सेवातत्त्वावरील चालक हा तहसीलदार यांच्या वाहनावर गेले तीन-चार महिने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार यांच्या वाहनासाठी जिल्हा महसूल विभागाकडून अर्थात शासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी वाहनचालकाची नियुक्ती केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यात अपेक्षित वाहनचालकच उपलब्ध नसल्याने चिपळूण न.प.कडून ठेकेदाराकडून पुरविलेल्या वाहनचालकाची ड्युटी तहसीलदारांच्या वाहनावर लावली जाते. या बाबतचा पगार देखील चिपळूण न.प.च्या वाहन विभागाकडून दिला जात आहे.