
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाने चिपळूणमध्ये वाहतूक कोंडी; रस्त्यावर साठले पाणी
चिपळूण : महामार्गाला पडलेले खड्डे आणि खड्ड्यांत साचलेले पाणी यातून मार्ग काढत चाकरमानी परतीच्या वाटेला लागले आहेत. गौरी-गणपतीचे विसर्जन करून मुंबई, पुण्याकडे परतणार्या चाकरमान्यांना चिपळुणात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सोमवारी दुपारी तीन वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होता. पावसाबरोबर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे चिपळुणात वाहतूक कोंडी होत आहे. यावर्षी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाले होते. कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सवाला येता न आल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील गौरी-गणपतीचे सोमवारी सायंकाळी थाटामाटात विसर्जन झाल्यानंतर रात्रीपासूनच व मंगळवारी दिवसभर चाकरमानी परतीच्या वाटेला लागले होते. यामुळे मुंबई – गोवा महामार्ग वाहनांनी फुलून गेला होता. त्यामुळे शहरात बहादूर शेख चौक आणि चिंचनाक्यामध्ये वाहतूक कोंडी होत होती.