कशेडी पोलिसांच्या तत्परतेने देवरूखमधील वृध्द दाम्पत्याला मिळाला लाखोंचा ऐवज परत
खेड : देवरूखमधून भिवंडीला बसने जाणारे वृध्द दाम्पत्य लघवी करण्यासाठी उतरले. त्यानंतर ही बस त्यांना न घेता निघून गेल्याने 10 तोळे सोन्याचे दागिने व 25 हजार रुपये ठेवलेली बॅग व अन्य साहित्य बसमध्येच राहिले होते. या घटनेने हवालदिल झालेल्या वृध्द दाम्पत्याच्या मदतीला कशेडी येथील पोलिस मदत केंद्रातील अधिकारी व कर्मचारी धाऊन आले व त्यांनी त्यांना त्यांचे साहित्य परत मिळवून देण्यासाठी मदत केली. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे आपल्या गावी आलेले शिवराम काशिराम जाधव (वय ५९) व शिल्पा शिवराम जाधव हे दाम्पत्य बुधवार दि.७ रोजी रात्री देवरूख येथून देवरूख-भिवंडी बसने निघाले होते. खेड तालुक्यातील भरणे येथे बस १५ मिनिटे थांबेल, असे सांगण्यात आल्याने हे दाम्पत्य बसमधून खाली उतरले. बसण्यासाठी परत येऊन पाहतात तर बस निघून गेल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्याचवेळी कशेडी येथील पोलिस मदत केंद्रातील उपनिरीक्षक श्री. चांदणे, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. समेल सुर्वे, श्री. दाभोळकर, श्री. दुर्गावळे हे मुंबई- गोवा महामार्गावर रात्री गस्त घालत असताना त्यांच्या नजरेस हे वृध्द जाधव दाम्पत्य पडले. त्यांनी घडला प्रकार पोलिस गस्त पथकाला सांगितला. पोलिस कर्मचारी यांनी तातडीने एसटी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून भिवंडी डेपोमध्ये संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वृध्द जाधव दाम्पत्याचे दहा तोळे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग बसमध्ये राहिल्याने ते चिंतेत होते. कशेडी पोलिसांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग व अन्य साहित्य मिळवून दिले. जाधव यांनी कशेडी मदत केंद्रातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.