बाप्पाच्या सणाने अवघा जिल्हा चैतन्यमय; घरोघरी घुमताहेत आरत्यांचे सूर
रत्नागिरी : चैतन्य आणि मांगल्यपूर्ण सणांचा राजा असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम बुधवारपासून जिल्ह्यात सुरू झाली. मोरया… मोरयाचा अखंड गजर करत लाडक्या बाप्पांचे आगमन चतुर्थीच्या मुहूर्तावर झाले. पाच, सात आणि अकरा दिवस भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा होत आहे. गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले. शहरांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गणेशभक्तांमध्ये उत्साह आहे. चाकरमानीही या उत्सवात सहभागी झाले आहेत.
चैतन्याचा, मांगल्याचा, प्रसन्नतेचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू देत, यासाठी पोलिस अहोरात्र कार्यरत आहेत. चाकरमान्यांच्या आगमनाबरोबरच महामार्ग तसेच अंतर्गत रस्ते वाहतूक सुरळीत सुरू रहावी, यासाठी जिल्हा पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी जादा पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतून पुणे-कोल्हापूरमार्गे रत्नागिरीत येणार्या भाविकांची संख्या यावर्षीही मोठी होती.
गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात खेडपासून- राजापूरपर्यंत प्रत्येक नाक्यावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. प्रत्येक संशयित वाहनाची तपासणी करण्यात येत होती. सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणीही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस तसेच होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच समुद्रकिनारी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंडळांचे कार्यकर्ते गेले काही दिवस डेकोरेशन, मंडप व्यवस्थेसाठी झटत होते. बुधवारीवारी मंडपांमध्ये श्री गणराज विराजमान झाल्याने या कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेने गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. काही घरगुती गणेशांचे दीड दिवसांनी शुक्रवारी विसर्जन झाले. रविवार 4 गौरी रोजी पूजन तर सोमवारी गौरी-गणपतींचे विसर्जन होणार आहे. काही गणेशभक्त सातव्या, नवव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात तर काही अनंत चतुर्थीला भव्य मिरवणुका काढून गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. गावागावांमध्ये सध्या आरती आणि भजनाचे सूर ऐकायला मिळत आहेत. तरुणांसह वृद्ध मंडळीही यात सहभागी होत आहेत.