शिवतीर्थावर बाळासाहेबांचे विचार मांडण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंनाच; शरद पवारांच्या विचारांच्या उद्धव ठाकरेंना तो अधिकार नाही : रामदास कदम यांची टीका
खेड : एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावर घ्यावा, हे माझे वैयक्तिक मत आहे. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. उध्दवजींकडे शरद पवार यांचे विचार आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांनाच आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडण्याचा नैतिक अधिकार शरद पवार यांच्या विचारांनी चालणार्या उद्धव ठाकरे यांना नाही, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी गुरुवारी दि.1 रोजी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केली आहे. शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह त्यांचे समर्थक खोके – खोके करून चिडवत आहेत. यावर माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जामगे येथे त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना जहाल वक्तव्य केले आहे. मातोश्रीला खोके नवीन नाहीत, मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले हे आम्हाला माहिती आहे, असेही कदम म्हणाले.