रत्नागिरीत उभारणार लॉजीस्टिक पार्क : उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरीसह जालना, भिवंडी, अकोला, सांगली, जळगाव, सोलापूर, नाशिक या ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार आहे. वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे पर्यायाने वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा उद्योजकांना आणि ग्राहकांना होणार आहे, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
कोकणच्या विकासासाठी आणि बंदरांस जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड या चौपदरी रस्त्याची मागणी त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्ताच्या बैठकीत ते बोलत होते.
श्री. सामंत म्हणाले, राज्यामध्ये वरील ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क झाल्यामुळे रत्नागिरी येथून आंबा, काजू, नाशिक, सांगली, जळगाव इत्यादी भागातून द्राक्ष, नागपूर येथून संत्री, अकोला येथून डाळ तसेच पश्चिम महाराष्ट्रातून साखर यांची निर्यात करणे अधिक सोयीचे होणार आहे. वाहतूक खर्चात कमी होणार असून या माध्यमातून निर्यात व्यवसायास गती मिळणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पार्क होणार आहेत त्या भागाच्या विकासामध्ये भर पडणार आहे. मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग, राष्ट्रीय महामार्ग लॉजीस्टिक मनेजमेंट आणि रेल्वे विकास निगम या विभागाच्या सामंजस्य करारानुसार हे पार्क तयार होणार आहेत. या पार्कसाठी आवश्यक जागा राज्यशासन उपलब्ध करून देणार आहे. याचे प्रस्ताव उद्योग विभागाकडून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवले जाणार आहेत.
कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरांस जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड या चौपदरी रस्त्याची मागणी केंद्रीय वाहतून मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उद्योगमंत्री सामंत यांनी केली. निवळी-जयगड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होईल. हा रस्ता चौपदरी झाल्यामुळे या भागातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. बंदराला रस्ते वाहतुकीने जोडण्यासाठी हा रस्ता महत्वपूर्ण असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावर ना. गडकरी यांनी याचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यास सांगितले.