
चिपळुणात राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलन उत्साहात
चिपळूण : पसायदान प्रतिष्ठान, गुहागर व कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर आणि जितेंद्र आव्हाड युवा मंच, रत्नागिरी आयोजित राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलन ‘लोटिस्मा’च्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात नुकतेच झाले. संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक आप्पासाहेब खोत (वारणानगर) यांनी केले. संमेलन अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत देशमुख होते.
यावेळी आ. शेखर निकम, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, प्रा. सर्जेराव रणखांब, लोटे-परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, उद्योजक बापू काणे, कवी प्रा. सुहास बारटक्के उपस्थित होते. उद्घाटक आप्पासाहेब खोत म्हणाले, साहित्य हे समाजाची वेदना मांडण्याचे माध्यम आहे. समाजाचे प्रश्न, त्याचे चिंतन, कथाकार करत असतो. कथा हे सकारात्मक जगण्याचे औषध आहे असे सांगत आपल्या अनेक कथांमधील उतारे त्यांनी कथन केले. यांनतर राजेंद्रकुमार शिंदे यांनी शाहीद खेरटकर यांच्यावरील कविता वाचून दाखविली. अध्यक्षीय मनोगत लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
यानंतर उत्तरार्धात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा झाला. यामध्ये उमलावे आतुनिच – प्रतिभा सरा(मुंबई), काही सांगता येत नाही : प्रमोदकुमार अणेराव (भंडारा), अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत : रमझान मुल्ला (सांगली) यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात करण्यात आले. प्रा. प्रतिभा सराफ यांनी आपल्या काव्यनिर्मितीचे मर्म उलगडून दाखविले. त्यानंतर निमंत्रितांचे राज्यस्तरीय कवी संमेलन झाली. अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ गझलकार रमेश सरकाटे (मुंबई)होते. यात मांगीलाल राठोड (बुलढाणा)यांनी ‘पिंपळगाव जळालं’, सिद्धेश शिगवण (दापोली) यांनी ‘कोकण’, संदीप येलये (सावर्डे) यांनी ‘बाप माझा’, मयुरेश माने (सावर्डे) ‘चिंतन’, बबन धुमाळ (पुणे) यांनी ‘गळलेला मोहर’ धनाजी घोरपडे (सांगली) यांनी ‘विद्रोह’, रमझान मुल्ला (सांगली) यांनी ‘काळजाच्या ओसरीत’ या कविता सादर केल्या. या कवितांना उपतस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
संमेलनाचे आयोजन डॉ. बाळासाहेब लबडे, शिवाजी पेडणेकर (जिल्हाध्यक्ष, जितेंद्र आव्हाड युवा मंच रत्नागिरी जिल्हा), शाहीर शाहिद खेरटकर (अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर) यांनी केले.