
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्यावतीने ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धा
चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्यावतीने ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील पहिल्या पाच आणि उत्तेजनार्थ दहा लोककलाकारांचा बक्षिसांनी सन्मान केला जाणार आहे. लोककलेच्या समृद्ध वारशाची जपणूक करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, भारूड, जाखडी, गोमू, काटखेळ, संकासूर, भजन, डेरा, कव्वाली, जलसा, गज्जो, कातकरी, आदिवासी, लोककला यासोबत जुनी सांस्कृतिक गीते, शेती गीते, भलरी गीते, लग्नगीते, होळीगीते, बारसागीते (सुहेर गीते), विधी गीते, डाक गीते, मुस्लीम विधी गीते, मुस्लीम विवाह गीते या व अशा इतर काळाच्या पडद्याआड चाललेल्या लोकगीते, लोककला, लोककथा, विधीकथा आणि सांस्कृतिक ठेवा यांचे संकलन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने चिपळूण मसापने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती सहभागी होऊ शकते. स्पर्धेतील प्रकार हा अस्सल पारंपरिक असणे अपेक्षित असून स्पर्धकाने त्याची लिखित संहिता पाठवणे बंधनकारक आहे. स्पर्धकाने उत्तमोत्तम पारंपरिक लोकगीते, लोककला, पारंपरिक सांस्कृतिक खेळ, संस्कृतीदर्शक कोणताही पारंपरिक रूढ प्रकार मोबाईल किंवा कॅमेर्याने शूटिंग करून या स्पर्धेसाठी पाठवायचा आहे. स्पर्धेतील गीत, कला, खेळ, रूढ प्रकार हे अस्सल पारंपरिकच असावेत. त्याची चाल, प्रकार, शब्द योजना, मांडणी कोणतेही आधुनिक संस्कार न करता मूळ जुन्या रूपातच असावी. व्हिडीओचा/कलेच्या प्रकाराचा कालावधी किती असावा याबद्दलचे स्वातंत्र्य व्हिडीओ बनविणार्याला आहे. जिल्ह्याबाहेर राहाणारा कोणीही मूळ रत्नागिरीकर या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. अशांनी आपल्या गावाचा स्पष्ट उल्लेख प्रवेशपत्रात करावा. या अभिनव स्पर्धेतून अंधश्रद्धांचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र भूतं, भगत, बाया, देवाचा नवस, अशुभ कार्याचे विधी यामध्येही गाण्यांची सांस्कृतिक ठेव आहे. पुरस्कारांचे स्वरूप पहिला क्रमांक – 21,000/- रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, हापूस आंब्याचे कलम, दुसरा क्रमांक – 15,000/- रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, हापूस आंब्याचे कलम, तिसरा क्रमांक – 11,000/- रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, हापूस आंब्याचे कलम, चौथा क्रमांक – 7,500/- रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, हापूस आंब्याचे कलम, पाचवा क्रमांक – 5,000/- रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, हापूस आंब्याचे कलम, उत्तेजनार्थ 10 बक्षिसे – प्रत्येकी 1,111/- रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुस्तके, हापूस आंब्याचे कलम तसेच पहिल्या 50 स्पर्धकांना हापूस आंबा कलम भेट देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. स्पर्धेचा निकाल आणि पुरस्कार वितरण सोहोळा चिपळूण येथे होणार्या ‘भव्य लोककला महोत्सवात’ संपन्न होईल. त्यावेळी यशस्वी कलावंतांना सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे असे प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले, स्पर्धा संयोजक प्रा. संतोष गोनबरे यांनी कळविले आहे. व्हिडीओ साईज मोठी झाल्यास ई-मेल गुगल ड्राईव्हवर शेअर करावा किंवा शक्य पेन ड्राईव्ह मधून स्पर्धा संयोजकांकडे जमा करावा.