
रत्नागिरी बस स्टँडचे कुलूप तोडून मंत्री ना. चव्हाण यांनी केली कामकाजाची पाहणी
रत्नागिरी एसटी स्टॅण्डच्या बंद पडलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री येणार म्हणून पोलीस यंत्रणा, एसटी अधिकारी उपस्थित होते. मात्र या ठिकाणी भलेमोठे कुलूप शेडला लावण्यात आलेले होते. मंत्री जवळ आले तरी किल्ली न सापडल्याने, ते कुलुप तोडण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर आली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी सकाळी रत्नागिरी एसटी स्टॅण्डच्या बंद पडलेल्या कामाची पाहणी केली. मंत्र्यांच्या गाड्या स्टॅण्ड परिसरात आल्या तरी याठिकाणी उभारण्यात आलेल्या शेडचे कुलूप उघडले नव्हते. त्यामुळे एसटी प्रशासनाची धावपळ उडाली. किल्ली न सापडल्याने अखेर हातोड्याचे घाव घालून कुलूप उघडण्यात आले व दरवाजा उघडून मंत्र्यांच्या गाड्या अर्धवट थांबलेल्या कामाच्या ठिकाणी आल्या.
याठिकाणी ना. चव्हाण यांनी एसटी स्टॅण्डच्या कामाची पाहणी केली व संबंधित अधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी या खोळंबलेल्या कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. पावसापाण्यात प्रवाशांना उभे रहावे लागते. बस थांब्यावर प्रचंड गर्दी होत असल्याने अपघाताची मोठी शक्यता असल्याची माहितीही अॅड. पटवर्धन यांनी दिली.