बूथ लेव्हलवर भाजपला मजबूत करूया : ना. रवींद्र चव्हाण
रत्नागिरी : आता पुन्हा एकदा राज्यात भाजप-सेनेची सत्ता आली आहे. राजकीय स्थित्यंतर होत असतात, त्यासाठी वरिष्ठ नेते मंडळी योग्य निर्णय घेतात. आपण बुथ लेव्हल अधिक मजबूत करण्यासाठी काम करुया आणि वरिष्ठांची ताकद वाढवूया,असे मार्गदर्शन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
रत्नागिरी दौर्यावर आलेले ना. रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा भाजप कार्यालयाला भेट देऊन उपस्थित प्रमुख पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले व आपण तुमच्या पाठीशी असून पक्ष वाढवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वस्त केले. वेळातवेळ काढून कार्यालयाला भेट दिल्यानंतर उभ्याउभ्यानेच ना. चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कार्यकर्त्यांनी नेत्यांचा उदो उदो करणे आता बंद करा, नेते मंडळी येत असतात, जात असतात. यापुढे देशाचा व पक्षाचा जयजयकार केला पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही स्फूर्ती येत असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
बुथ लेव्हलवर पक्षाचा जनाधार कसा वाढेल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे. आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. यापूर्वी सत्ता नव्हती त्यामुळे कार्यकर्त्यांची कामे होत नव्हती. परंतु आता सत्ता आल्याने पक्ष वाढीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे असे स्पष्ट मत ना. रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार प्रमोद जठार, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, उमेश कुलकर्णी, अनिकेत पटवर्धन, राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, सचिन वहाळकर, सौ. ऐश्वर्या जठार, सौ. शोनाली आंबेरकर, अॅड. बाबासाहेब परुळेकर, सचिन करमरकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.