बारसू-धोपेश्वर पंचक्रोशीमध्ये रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी उद्योगमंत्री सामंत यांना निवेदन
राजापूर : तालुक्यातील बारसु धोपेश्वर पंचक्रोशीमध्ये रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी दिवसेंगणिक वाढत असतानाच प्रकल्प समर्थकांनी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत राजापूर तालुक्यातच रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. प्रकल्प समर्थकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदने पाठविण्यात आली असून त्यांचेही रिफायनरी प्रकल्पाबाबत लक्ष वेधण्यात आले आहे.
या देण्यात आलेल्या निवेदनात रिफायनरी प्रकल्पाबाबतची सत्यस्थिती आजवर कशी दडविली गेली. कसे गैरसमज पसरविले गेले त्यावर प्रकाशझोत टाकताना प्रकल्प परिसरात येऊन एनजीओंकडून होत असलेली दिशाभूल याचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी उद्योगमंत्र्यांकडे करताना भविष्यात कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी रिफायनरी प्रकल्प फायदेशीर ठरेल. त्यामुळे राजापूरमध्ये प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी करण्यात आली आहे.