लोटे औद्योगीक वसाहतीतील सांडपाणी असगणी गावच्या ओढ्यात

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कारखान्याचे सांडपाणी थेट असंगणी गावातील ओढ्यात सोडल्याचे निदर्शनास आल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. ओढ्यात सोडण्यात आलेल्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे परिसरातील भातशेतीचेही नुकसान झाले आहे तर नैसर्गिक पाणी स्रोत दूषित झाल्याने भर पावसात येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ओढ्याच्या दूषित पाण्यामुळे पाळीव जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने ग्रामस्थांनी सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानदार कारखान्यातील सांडपाणी पावसाचा आधार घेत थेट नाल्यात किंवा ओढ्यात सोडत आहेत. पैसे वाचविण्याचा कारखान्यांचा हा प्रयत्न आहे मात्र कारखाना व्यवस्थानपनाचा हा प्रयत्न परिसरातील ग्रामस्थांच्या जीवावर बेतू लागला आहे. रसायन मिश्रित पाणी प्यायल्याने ग्रामशाना वेगवेगळ्या असाध्य रोगांना सामोरे जावे लागत आहे. काहीजणांना उलट्या जुलाब होत आहेत. श्वसनाचाही त्रास सहन करावा लागतो आहे, चर्मरोगाने हैराण केले आहे मात्र कारखानदारांना याचे सोयर सुतक नाही. मध्यरात्री पाऊस पडू लागला की रासायनिक कारखान्याचे सांडपाणी थेट नाल्यात किंवा ओढ्यात सोडण्यात येते हे पाणी आजूबाजूच्या शेतीत जात असल्याने शेतीचे नुकसान तर होतेच परंतु सर्वजनिक पाणवठे, पाळीव जनावरांच्या चरण्याचे कुरण, पाणी पिण्याचे डोह देखील दूषित होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे सर्वच बाजूने नुकसान होत आहे. रासायनिक कारखान्यांचे मालक रात्रीच्या काळोखात जे पाप करत आहेत त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. प्रदूषणामुळे जिवंतपणीच नरकयातना भोगणाऱ्या परिसरातील ग्रामस्थांना वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रासायनिक सांडपाण्यावर रासायनिक कारखाना व्यवस्थापनाने स्वतःच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया करून ते पाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात पाठवायचे आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी जलवाहिनीद्वारे खोल समुद्रात सोडायचे आहे. रासायनिक कारखान्यांच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे हेच शासकीय निर्देश आहेत मात्र यासाठी कारखानदारांना सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला पैसे मोजावे लागत असल्याने कारखानदार आपल्या रासायनिक कारखान्यातील सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात न पाठवत ते पाणी थेट परिसरातील नाल्यात किंवा ओढ्यात सोडतात. यामुळे कारखानदारांचे हजारो रुपये वाचतात मात्र कारखानदारांच्या पैसे वाचविण्याच्या प्रयात्नात परिसरातील शेतकऱ्यांना लाख मोलाचा जीव गमवावा लागतो आहे. नाल्यात किंवा ओढ्यात सांडपाणी सोडल्याचे निदर्शनाला आल्यावर परिसरातील शेतकरी आंदोलनाचा पवित्रा घेतात. आंदोलनहीकरतात देतात मात्र या शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन कारखानदाराकडून चिरडले जातात.
पाऊस सुरु झाल्यापासून नाल्यात सांडपाणी सोडून नाल्यातील पाणी दूषित करण्याची आजची चौथी घटना आहे. आधीच्या तीन घटनांबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडून कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात कोणतीही करावी झालेली नाही. रासायनिक सांडपाणी नाल्यात किंवा ओढ्यात सोडणाऱ्या एका जरी कारखानदारावर कारवाई झाली असती तर दुसऱ्या रासायनिक कारखाना व्यवस्थापने ओढ्यात रासायनिक पाणी सोडण्याचे धाडस केले नसते मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा पोलीस काहीच कारवाई करत नसल्याने कारखानदारांचे फावले आहे.
असगणी गावातून वाहणाऱ्या जांभुळीच्या ओढ्यात ज्या रासायनिक कारखानदाराने सांडपाणी सोडले आहे त्या कारखानदाराला शोधून त्या कारखानदारावर कठोरातील कठोर कारवाई करावी अन्यथा रासायनिक प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या कारखानदारांना परिसरातील नागरिक सळो कि पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा असगणी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप फडकले यांनी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button