पांगरे बुद्रुक धरण सांडव्यातील मुख्य दरवाजाला लागलेल्या गळतीबाबत आमदार डॉ. राजन साळवी यांनी अधिवेशनात केला तारांकित प्रश्न
राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक धरण सांडव्यातील मुख्य दरवाजाला लागलेल्या गळतीबाबत आमदार डॉ. राजन साळवी यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई येथे चालू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात डॉ. राजन साळवी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामध्ये म्हटले आहे की, पांगरे बुद्रुक धरणाचे काम सन 2010 मध्ये पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत सांडव्यातील मुख्य दरवाजाला गळती लागल्यामुळे धरणात केवळ पंचवीस ते तीस टक्के पाणी शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे. या धरणातून चौदा गावांच्या नळपाणी योजनेसाठी पंचवीस कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे का? तसेच सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून धरणाच्या सांडव्यातील पाण्याची गळती रोखण्यासाठी कोणती कार्यवाही केली, अथवा करण्यात येत आहे? असा मुद्दा उपस्थित केला आहे.
आमदार डॉ. राजन साळवींच्या या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अंशतः खरे असल्याचे मान्य करत धरणाच्या मुख्य सांडवा द्वारविरहीत असून सांडव्याला गळती लागलेली नाही. धरणाच्या मुख्य विमोचकाच्या विहिरीतील सेवाद्वाराच्या रबरसिल मधून अल्प प्रमाणात गळती होत असल्याचे सांगितले.
धरणाच्या सेवाद्वाराच्या रबरसिलमधून अल्पप्रमाणात होणारी गळती थांबविणेचे काम यांत्रिकी संघटनेच्या पाखरण कार्यक्रमामध्ये प्रस्तावित असून सन 2022-23 च्या प्रापण सूचीमध्ये सदर कामाचा समावेश करण्यात आलेला असल्याचे स्पष्ट केले. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पांगरे बुद्रुक व 14 गावांसाठी रु.25.65 कोटी इतक्या किमतीच्या प्रादेशिक पाणी योजनेला महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने 11 मे 2022 रोजी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. निविदा कार्यवाही पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असल्याचेही ना. फडणवीस यांनी स्पष्ट केले.