परशुराम घाटात एसटीला टँकरने मागून धडक दिली आणि बस रस्त्याच्या बाजूला उलटली…प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून, अन्यथा…
चिपळूण : परशुराम घाटात एसटी बसला मागून टँकरने धडक देऊन अपघात झाला. यामध्ये एसटी बस रस्त्याच्या एका बाजूला उलटली. मुंबई-गोवा महामार्गावरील या अपघातात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले.
हा अपघात शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता झाला. बसमध्ये 64 प्रवासी होते.
जखमींना कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. चिपळूण आगाराची एसटी बस खेडहून चिपळूणला येत होती. सुदैवाने एसटी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटल्याने अनर्थ टळला. अन्यथा उजव्या बाजूला दरीचा मोठा धोका होता. सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढून अन्य बसच्या साह्याने चिपळूण आगारात आणण्यात आले. त्यातील दोघांना दुखापत झाली असून त्यांच्यावर कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. नंदिनी बडदे (31, परशुराम) व अन्य एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. क्रेनच्या साह्याने एसटी बस बाहेर काढण्यात आली.