सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या दौर्याने वाढल्या कोकणवासीयांच्या अपेक्षा; शुक्रवारी महामार्गाची करणार पाहणी
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण आणि पडलेले खड्डे यांची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे शुक्रवारी करणार आहेत. ना. चव्हाण यांच्या पाहणीनंतर प्रशासन कार्यरत होणार का? रखडलेल्या कामाला गती येणार का? चाकरमान्यांचा प्रवास सुकर होणार का? याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था अजूनही कायम आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन बारा वर्षे उलटली तरी हे काम गती घेत नाही. विशेषकरून रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग खड्डेमय झाला आहे. गणेशोत्सवापूर्वी शासनाने खड्डे भरण्याचे आदेश दिले असले तरी काम व्यवस्थित होत नाही. गेली अनेक वर्षे महामार्ग खड्ड्यात आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभागाला चौपदरीकरणाचे काम तातडीने मार्गी लावणे शक्य होत नाही. उच्च न्यायालयात अनेकवेळा सुनावणी होऊन देखील राज्य शासन व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डोळे उघडलेले नाहीत. परिणामी वर्षभरात अपघात वाढत आहेत. गेली काही वर्षे तर राज्यातील मंत्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर दौरा करतात. मात्र प्रत्यक्ष काम व अंदाजपत्रक याचा ताळमेळ कधीच जुळत नाही. यामुळे महामार्ग कायमचा खड्डेमय झाला आहे. आता शिंदे सरकारमधील नवीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने तरी कोकणवासीयांच्या समस्या सुटणार का? याकडे लक्ष लागले आहे.