सांगवेतील सप्तलिंगी नदीच्या पुलाखाली आढळली अपघातग्रस्त दुचाकी, दुचाकीस्वाराचा पोलिसांकडून शोध सुरू
संगमेश्वर : तालुक्यातील सांगवे येथे सप्तलिंगी नदीच्या पुलाखाली एक सीडी डीलक्स दुचाकी अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली आहे. मात्र दुचाकीस्वार बेपत्ता असून त्याचा शोध नदीपात्रात देवरूख पोलिस घेत आहेत. या दुचाकी शेजारी हेल्मेट आणि बॅक मिळून आली आहे. दरम्यान, घटनास्थळी केवळ अपघातग्रस्त दुचाकी आढळून आल्याने दुचाकीस्वाराचे काय झाले? याबाबत अद्याप गुढ कायम आहे. याबाबत देवरूख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारच्या दरम्यान सांगवे सप्तलिंगी नदीच्या पुलाखालील बाजूस लाल रंगाची सीडी डीलक्स गाडी (एमएच 08, टी 2370) अशी दुचाकी पडलेल्या स्थितीत होती. अशी माहिती मिळताच देवरूखचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपले सहकारी सहायक उपनिरीक्षक डी. एस. पवार, हेड कॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, संदीप जाधव, हे. काँ. संतोष सडकर, पो. काँ. प्रथमेश उकार्डे यांना घेऊन घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. हा दुचाकीस्वार वाहून गेला असावा आणि त्यानुसार शोध मोहीम राबविली जात आहे. या शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना देवदत्त शेलार, अस्लम धामणस्कर, बाळकृष्ण पवार, संजय शेलार, पांडुरंग खाके, प्रशांत कांबळे, सुहास शेलार, नरसिंग शेलार, प्रशांत शिंदे आदींसह इतर ग्रामस्थ सहकार्य करत आहेत.