रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांचे आंदोलन
रत्नागिरी : जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. प्रशासनाला 25 मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. या आंदोलनात 300 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. जि. प.समोर आंदोलन झाल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विजया शिंदे, विद्या भालकर, पल्लवी पारकर, सुरभी भोसले ,वेदिका गडचे, जयश्री साठे, मनिषा जाधव, रेश्मा खेडेकर, पूजा जाधव, संजीवनी तिवरेकर, अश्विनी शेलार, तनुजा कांबळे, सोनाली बाईक, श्वेता चव्हाण व वृषाली जाधव यांनी केले. महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा मिळावा. जोपर्यंत शासकीय कर्मचार्यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत दरमहा 25 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये मिळाले पाहिजेत. आशा महिलांना ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही त्याची सक्ती करता कामा नये. सक्ती करणार्या अधिकार्यांच्यावर कारवाई करावी. आरोग्यवर्धिनी कामकाजासाठी सीएचओ नेमले नसल्यास त्या ठिकाणच्या जिल्ह्यातील निम्म्या आशांना एक हजार रुपये काम करूनही मिळत नाहीत. अशा एकूण 25 मागण्यांचा समावेश आहे