रत्नागिरीला पाणीपुरवठा करणार्या पानवल धरणाच्या मजबुतीकरणासाठी 8 कोटींचा प्रस्ताव
रत्नागिरी : शहराला पाणी पुरवठा करणार्या पानवल धरणाच्या मजबुतीकरण कामासाठी चालना मिळाली आहे. पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित झाल्याने या धरणाच्या दुरूस्तीचा 8 कोटी 74 लाख रुपयांचा प्रस्ताव मार्गी लागणार आहे. नाशिकमधील मेरी संस्थेकडून फेर सर्व्हे करून या धरणातील गाळ काढून दगडी बांधकामाने दुरूस्ती करून घेतली जाणार आहे. कोकण पदवीधर मतदार संघाचे आ. निरंजन डावखरे यांनी हा तारांकीत प्रश्न उपस्थित केला. नगरविकास मंत्रालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांना या प्रश्नावर बाजू मांडावी लागली. त्यानुसार नाशिकच्या मेरी संस्थेकडून पानवल धरणाची पाहणी केली जाणार आहे. धरण बांधकामाची दुरूस्ती करून गळती कमी केली जाईल. सांडव्याचे काम करून आणि धरणातील साचलेला गाळ काढून साठवण क्षमता वाढवली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांंगितले.