चिपळूणकरांना उपयुक्त ठरणारी मेमू कायम सुरू ठेवण्याची मागणी
चिपळूण : कोकण रेल्वे प्रशासनाने आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर रोहा-चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आठ डब्याची ही गाडी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर ही गाडी बंद न करता ती गाडी कायमस्वरुपी चालू ठेवावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
कोकण रेल्वेने कोकणातील लाडक्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने गणेशोत्सवासाठी दि.19 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत मेमू स्पेशल गाडी सुरू केली आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणार्या मेमू ट्रेनच्या फेर्या रोहा -चिपळूण अशा विस्तारित करण्यात आल्या आहेत. मात्र आम्ही दादर ते चिपळूण या गाडीची गेले अनेक वर्षे मागणी केली आहे. ती गाडी अद्याप सुरू केलेली नाही. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांचीची भेट घेतली होती. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासन दिले होते.
गणेशोत्सवासाठी सुरू केलेली दिवा ते रोहा ही मेमू गाडी कायमस्वरूपी विस्तारित करून दिवा-चिपळूण अशी चालवावी व या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.