
श्रावणात गजबजतेय दापोलीतील माणकेश्वर मंदिर
दापोली : तालुक्यातील असोंड, फणसू, उर्फी या तीन गावांच्या सिमेवर असणारे पुरातन माणकेश्वर मंदिर हे येथील पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्रावणात हे मंदिर गजबजते. पूर्वी हे मंदिर येथील दाट झाडीझुडपात होते. मंदिराची उभारणी पूर्णतः कोरीव दगडात करण्यात आली असून मंदिर पांडवकालीन असल्याचेही बोलले जाते. पूर्ण मंदिर परिसरात नीरव शांतता असल्याने येथे एकांतात आध्यात्मिकतेची अनुभूती येते, असे अनेकजण सांगतात. या मंदिराच्या शिवपिंडीवर अनेकदा नागराजाचे दर्शन देखील अनेक भक्तांना झाले आहे, असे भक्त सांगतात. पुरातन मंदिर असल्याने या मंदिराची पडझड झाली होती. 2005 साली असोंड गावाच्या वतीने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. येथील शिवपिंड, नदी आणि अन्य देवी-देवता यांच्या स्वयंभू मूर्ती आहेत. श्रावण महिन्यात येथे दूरवरून भक्त दर्शनासाठी
येतात. मंदिराच्या सभोवताली असणारी दाट झाडी, विविध प्राणी, पक्षी आणि बारमाही शुभ्र पाणी असणारी विहीर असे येथील वातावरण अनेकांना प्रसन्न करते. या मंदिरात श्रावण महिन्यात अभिषेक होतात. तर येथील पड्याळवाडी आणि गणेशवाडी यांच्यावतीने येथे सत्यनारायण पूजा घातली जाते. या माणकेश्वराच्या दर्शनाने अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत, असे भक्त सांगतात. सुभाष परबलकर हे येथे पुजारी म्हणून देवाची सेवा करतात. येथे शासनाच्या वतीने काही सोयीसुविधा झाल्यास हे पर्यटन ठिकाण म्हणून नावारूपास येईल, असे ग्रामस्थ सांगतात. या पुरातन वास्तूचे जतन व्हावे, अशी भावना येथील ग्रामस्थांची
आहे.