
रत्नागिरीतील रस्ते खड्डेमय; नागरिकांतून संताप
रत्नागिरी : शहराचा प्रमुख रस्ता व बाजारपेठेतील रस्ते खड्डेमय झाले असून केवळ डागडुजी करण्यापेक्षा कायमस्वरुपी पर्याय काढण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे. खड्ड्यांमधील पाणी न काढता त्यामध्येच डबर आणि काही ठिकाणी सिमेंटमिश्रित वाळू टाकली जात असल्याने खड्डे उखडण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील सर्वच रस्ते चार महिन्यांपूर्वी गुळगुळीत करण्यात आले होते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र सध्याची शहराची स्थिती पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मारुती मंदिर सर्कल, एस.टी. स्टँड, गोखले नाका, मारुती आळीसह अनेक ठिकाणी खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यांवरुन विशेषत: दुचाकी वाहने चालविताना अगदी काळजीपूर्वक चालवावे लागत आहे. नगर परिषदेने याकडे गणेशोत्सवापूर्वी गांभिर्याने लक्ष घालावे कोणाचा बळी जाण्याची वाट पाहू नये, अशाही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावरून उमटत आहेत.