
कात्रण गावातील अखंड शिळेतील पांडवकालीन शिवलिंग
दापोली : तालुक्यातील कात्रण गावातील अखंड शिळेतील शिवलिंग हे पांडवकालीन असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. हे शिवलिंग महादेव या नावाने या परिसरात परिचित आहे. हे ठिकाण पुरातन काळाची साक्ष देत आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो. श्रावणात येथे गावच्यावतीने पूजाअर्चा केली जाते.
जांभ्या दगडातील अखंड शिळेत हे महादेवाचे स्थान असून स्वयंभू आहे.हे मंदिर ज्या नदीकाठी वसलेले आहे, ती बाळनवी नदी ही बारमाही वाहत आहे.
दापोली-भडवळे या मुख्य मार्गावर हे मंदिर असून श्रावण महिन्यात येथे परिसरातील नागरिक दर्शनासाठी येतात. तालुक्यात अखंड शिळेतील दाभोळ येथील चंडिका मंदिर आहे. त्यानंतर कात्रण येथील हे अखंड शिळेतील महादेव मंदिर आहे.
पूर्वी हे मंदिर येथील डोंगरात फक्त जोत्या स्वरूपात होते. त्यानंतर येथील राजू मळेकर यांनी हे मंदिर दृष्टीक्षेपात आणले. त्यानंतर या मंदिराचा कात्रण गावच्या वतीने जीर्णोद्धार करण्यात आला, असे येथील नागरिक प्रकाश मळेकर यांनी माहिती देताना सांगितले. या मंदिराची देखभाल आणि पूजा रामचंद्र शिगवण हे करत आहेत. या महादेव मंदिरामुळे या गावाला पुरातन वारसा लाभला आहे. कात्रण या परिसरात अनेक पुरातन वारसा असलेली शिल्प आणि देवालये आहेत. त्यातील हे एक पुरातन महादेव मंदिर आहे.