राज्य नाट्य स्पर्धेसाठी आवाहन
रत्नागिरी : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. 61 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 15 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी 1 जानेवारी 2023 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 जानेवारी 2023 पासून 10 केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून, दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2023 मध्ये आयाजित करण्यात येणार आहे. नाट्य स्पर्धेकरीता रु.3 हजार इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष तर बालनाट्य स्पर्धेकरीता रु.1 हजार इतक्या रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. प्रवेशिका मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात. जास्तीत-जास्त नाट्य संस्थांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.