बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान : ठाकरे सरकारची केवळ घोषणा, भाजप-सेना सरकारची ठोस कृती!

गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी तातडीने ४७०० कोटींची तरतूद केल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री.दिपक पटवर्धन यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.

अडीच वर्षे केवळ घोषणाबाजी करणारे आघाडी सरकार गडगडल्यानंतर सत्तेवर येताच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याचे शिवसेना-भाजप युती सरकारने जाहीर केले होते. राज्यातील १३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांच्या १४ लाख ५७ हजार कर्ज खात्यांमध्ये सुमारे पाच हजार कोटींचा निधी जमा होणार असून मोठा आर्थिक दिलासा देणारा हा निर्णय विनाविलंब अमलात यावा यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तातडीने त्यासाठी ४७०० कोटींची पुरवणी मागणी मंजूर करून घेऊन सरकारने आपली बांधिलकी कृतीतून सिद्ध केली आहे, असे श्री.दिपक पटवर्धन म्हणाले.

ठाकरे सरकारने अर्थसंकल्पीय भाषणातून यासंबंधीचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी केली नाही. केवळ कागदी घोषणा करून दोन वर्षे शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यास या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे श्री. दिपक पटवर्धन यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे १४ लाख शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनातील सुमारे पाच हजार कोटींचा बोजा हलका होणार असून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यास मिळणार असल्याने मदतीसाठी हेलपाटे न घालता शेतकऱ्याची प्रतिष्ठा जपण्याची सरकारची भावना महत्वाची आहे, असे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी म्हटले आहे.

सन २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अतोनात नुकसान झालेला शेतकरी प्रत्यक्षात अडीच वर्षे मदतीपासून वंचित राहिला होता. ठाकरे सरकारने केवळ घोषणांचे गाजर दाखवून शेतकऱ्याची उपेक्षा केली. या आपत्तींनंतरच्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यालादेखील भाजप-सेना युती सरकारच्या नव्या प्रोत्साहनपर योजनेत समाविष्ट केल्याबद्दल श्री . पटवर्धन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button