27 कोटींचा खर्च झालेले रस्ते चार महिन्यांतच उखडले…हा तर जनतेच्या पैशाचा अपव्यय…रत्नागिरीत काँग्रेसचे खड्डे भरो आंदोलन
रत्नागिरी : शहरात रस्ते अतिशय दर्जाचे करून जनतेच्या पैशाचा अपव्यय करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने बुधवारी खड्डे भरो आंदोलन केले. दर्जाहीन काम करणार्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली.
वाळू भरलेला टेम्पो, सिमेंटची गोणी, फावडी, घमेली, पाणी काढण्यासाठी बादली, खोरे असे साहित्य घेऊन काँग्रेसभुवन येथून खड्डे भरण्याचे आंदोलन सुरू केले. खड्ड्यातील पाणी काढून त्यामध्ये वाळू आणि सिमेंट टाकण्यात आले. काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष संजय उर्फ बाळा मयेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसभुवन परिसरात श्रमदानातून रस्त्यातील खड्डे भरण्यात आले. यावेळी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, महिला आघाडीच्या अॅड. आगाशे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावर बोलताना बाळा मयेकर म्हणाले की, जनतेच्या पैशाची ही लूट आहे. सर्वसामान्य नागरिकांना योग्य आणि दर्जेदार मुलभूत सुविधा हव्या आहेत. रस्त्यांची अवस्था पाहून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्ते 27 कोटी रुपये खर्च करून गुळगुळीत करण्यात आले. मात्र, चार महिन्यातच विशेषत: शहराच्या खालील भागात रस्त्यांची वाताहत झाली. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.