भाट्ये खाडीतील मांडवी बंदरालगतचा गाळ धोकादायक; रत्नागिरीतील मच्छीमार आक्रमक, गाळ काढण्याची मागणी
रत्नागिरी : भाट्ये खाडीतील मांडवी बंदरालगत गाळाचा प्रश्न जैसे थेच असल्याने मच्छीमारांना समुद्रात ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. गाळामुळे हा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असल्याने राजिवडा, भाट्ये, फणसोप, कर्ला गावातील मच्छिमार आक्रमक झाले असून संघर्षाची तयारी सुरू केली आहे. मागील 25 -30 वर्षापासून भाट्ये खाडीत मांडवी बंदरालगत गाळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या भागात ओहोटीच्यावेळी छोटा मार्गच शिल्लक राहत असून तोही आता गाळाने बंद होण्याच्या मार्गावर आहे. भाट्ये पूल ते मांडवी पर्यंतचा भाग आता गाळाने भरत चालला आहे. त्यामुळे भरतीच्यावेळीच मोठ्या नौकांना बंदरात प्रवेशासाठी थांबावे लागते. छोटे मच्छीमार आपल्या नौका जिवावर उदार होऊन बंदरात येत असतात. मागील काही वर्ष या भागात नौका गाळात रुतण्याचे व उलटण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. गाळ काढण्याची मागणी मच्छीमारांकडून होत आहे. यासाठी राजिवडा येथील जमातुल मुस्लिमीन कोअर कमिटीने राजिवडा, भाट्ये, कर्ला व फणसोप येथील मच्छीमार संस्थाचे पदाधिकारी आणि मच्छीमार यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मच्छीमारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही केली. यावेळी कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, उपाध्यक्ष शब्बीर भाटकर, महंमद सईद फणसोपकर, शफी वस्ता, दरबार वाडकर, नदीम सोलकर, अरमान भाटकर, मुनीर मुकादम, जहुर बुड्ये यांच्यासह मोठ्या संख्येने मच्छीमार उपस्थित होते.