
ना. उदय सामंत पुरस्कृत दहीहंडी यंदा मांडवीऐवजी प्रमोद महाजन क्रीडा संकुलात
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत पुरस्कृत रत्नागिरीतील प्रसिध्द श्री प्रतिष्ठान आयोजित दंहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखदार पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी मांडवीऐवजी प्रमोद महाजन क्रीडा संकुलात दहीहंडी उत्सव होणार आहे.
ना. सामंत यांनी रत्नागिरीतील मांडवी किनारी दहीहंडी उत्सव आयोजित करून या उत्सवानिमित्ताने तरुणाईच्या जल्लोषाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्ष सर्वत्रच हा उत्सव बंद ठेवण्यात आला होता. कोरोना ओसरल्यानंतर पुन्हा एकदा सण उत्साहात साजरे होऊ लागले आहेत. रत्नागिरीकरांनीही विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित केले आहेत. ना. उदय सामंत पुरस्कृत श्री प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव यावर्षी प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. एका मिनिटात पाच थर लावून सलामी देणार्या पथकाला पाच हजार तर एक मिनिटापेक्षा अधिक वेळ लावणार्या पथकाला दोन हजाराचे पारितोषिक दिले जाणार आहे. कमी वेळेत सलामी देणार्या दोन संघांना अंतिम फेरीत स्थान दिले जाणार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रथमेश साळवी व अभिजित दुडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.