आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 21 रोजी अल्पबचत सभागृहात बैठक

रत्नागिरी : औषधे, खतांच्या किमती नियंत्रित ठेवणे, कर्जमाफी आणि वीजबिलांच्या जादा भारातून आंबा बागायतदारांची सोडवणूक यासह आठ ते दहा मागण्या राज्य व केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय आंबा उत्पादकांनी घेतला आहे. बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 21 ऑगस्टला बैठकीचे आयोजन केले आहे.
आंबा बागायतदार लागवडीपासून काढणीपर्यंत अहोरात्र कष्ट घेतात. खते, कीटकनाशके, औषधे प्रचंड महाग झाली आहेत. फळमाशीचा प्रादुर्भाव, पाठोपाठ फयान, तोक्ते, निसर्ग ही वादळे, अवकाळी पाऊस यासारख्या संकटांचाही सामना करावा लागत आहे. शेतकर्‍यांच्या संकटात सरकार आणि प्रशासनाकडून कसलेही सहकार्य मिळत नाही. कर्जमाफीसारख्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाहीत. 2014-15 या वर्षाच्या कर्जावरील व्याज माफ करण्याचा आणि पुढील चार वर्षाचे 6 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला होता. परंतु सात वर्षे झाली त्याची अमंलबजावणीच झाली नाही. संकटग्रस्त बागायतदारांना राज्य व केंद्र सरकारने संकटातून मुक्त करणे गरजेचे आहे. आंबा, काजू बागायतदार शेतकरी यांना पीक विमा नुकसान भरपाई आणि विमा रकमेतील तफावत मिळाली पाहिजे. बागायतदार शेतकरी उत्पादन निर्माण करू शकतात, पण विकू शकत नाहीत. त्यासाठी शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, अशा मागण्या करण्यात येणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी माती परिक्षण, खतांचे परिक्षण, औषधांचे परिक्षण करण्यासाठी सक्षम प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे. ना. उदय सामंत यांनी शेतकर्‍यांच्या मागण्यांची दखल घेत 21 ऑगस्टला सकाळी 11 वाजता अल्पबचत सभागृहात बागायतदारांच्या समस्यांवर बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा बँक प्रतिनिधी, कृषी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला बागायतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी संघर्ष समितीचे नंदकुमार मोहिते आणि आंबा उत्पादक संस्थेचे प्रकाश साळवी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button