
वाशिष्ठी नदीकिनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा; गुरुवारी सोडणार धरणातून पाणी
चिपळूण : गुरुवारी कोळकेवाडी धरणाचे वक्र दरवाजे उघडून दोन हजार क्युसेक पाणी वाशिष्ठी नदीपात्रात सोडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलादवाडी नाला तसेच वाशिष्ठी नदीकिनार्यालगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोळकेवाडी धरण संतुलित जलाशय म्हणून वापरले जाते. या धरणाचे दरवाजे उघडून वाशिष्ठी नदीपात्रात कधीही पाणी सोडले जात नाही तर वीजनिर्मिती करून कालव्याद्वारे अवजल नियंत्रितपणे सोडण्यात येते. धरणातून पाणी सोडून बोलादवाडी नाल्याची वहनक्षमता तपासणे, वाशिष्ठी नदीपात्रात पाणी पातळीची होणारी वाढ तपासणे, कोळकेवाडी धरण ते दळवटणे या भागात पाणी येण्यास लागणारा वेळ तपासणे व अन्य तांत्रिक अभ्यास यातून केला जाणार आहे.