
महापुराचा चिपळूण परिसरातील तब्बल पाच हजार वाहनांना मोठा फटका ,हजारो वाहने निकामी झाली
चिपळुण आलेल्या महापुरामध्ये खेर्डी व चिपळूण परिसरातील तब्बल पाच हजार वाहनांना मोठा फटका बसला आहे. त्यातील हजारो वाहने निकामी झाली आहेत. त्यामुळे मालमत्तेचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने पार्किंग किंवा रस्त्यावर उभी असलेली अनेक वाहने या पाण्याबरोबर वाहत गेली.
त्यामुळे दुचाकी आणि आलिशान कार यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. खेर्डीच्या दुतर्फा अनेक वाहने रस्त्याच्या कडेला पूर ओसरल्यानंतर अडकून पडल्याचे चित्र होते. त्याच पद्धतीने वाशिष्ठी नदीकिनारी देखील अनेक वाहने वाहत जाताना अडकल्याचे निदर्शनास आले. विशेषकरून खेर्डी, मार्कंडी, काविळतळी, गोवळकोट रोड या भागात मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे तर अनेक इमारतींच्या पार्किंगमधील वाहनेदेखील पाणी शिरल्याने बंद आहेत.
शहरातील मोटारसायकलची गॅरेज व कार गॅरेजमध्ये सध्या अशा वाहनांची संख्या मोठी असून दुरूस्तीसाठी लोकांना प्रतिक्षा करावी लागत आहे तर ज्या लोकांच्या वाहनांचा विमा आहे अशी वाहने रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी संबंधित कंपन्या वाहने टोईंग करून नेत आहेत.
www.konkantoday.com