सैनिकांच्या आहुतीमुळे 1857 च्या उठावापासून कारगील युद्धापर्यंत भारत देशाचे रक्षण झाले… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी सैनिक शंकरराव मिलके सांगताहेत आपले अनुभव

रत्नागिरी : सैनिकांनी 1857 ते सन 1947 अशी नव्वद वर्षे ब्रिटीश राजवटीविरोधात प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यानंतर सन 1962 चीन, सन 1965 भारत-पाकिस्तान, सन 1971 पाकिस्तान बांग्लादेश व सन 1997-98 कारगील अशी चार युध्दे जिंकून आम्ही सैनिकांनी देशाची सीमा व संपत्ती आबाधित ठेवली आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण व देशाप्रति केलेल्या आपल्या सैनिकांच्या कार्याचे कौतुक स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी केले जाते. त्याचा अभिमान आम्हालादेखील आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाला माझा मानाचा सॅल्यूट.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारत देशामध्ये घरोघरी तिरंगा फडकवून साजरा होतो आहे, याचा आम्हा सैनिकांना मनस्वी आनंद होत आहे. सन 1857 ला स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश सरकारविरुध्द पहिले बंड पुकारले, त्या बंडामध्ये देशाची सारी जनता सहभागी झाली होती. राजे-महाराजे विलीन झाले. ब्रिटीश सरकारला भारतातून घालवण्यासाठी आंदोलन करीत होते. आंदोलन करणारे नेते व नागरिक ब्रिटीश कार्यालयांना आगी लावणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, त्यांची सारी यंत्रणा बंद पाडत होते. नागरिक अशा कृत्यांनी ब्रिटीश सरकारची सारी यंत्रणा बंद करू पाहत होते. पोलिस धरपकड, मारझोड करून जेलमध्ये टाकत होते. या भीतीपोटी आंदोलक जंगलामध्ये लपून राहत होते. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय त्या-त्या गावातील ग्रामस्थांनी पिठलं-भाकरी गोळा करून चोरून त्या स्वातंत्र्य सैनिकांना पुरवित होते. ते अन्न खाऊनच स्वातंत्र सैनिक जंगलात लपून राहत असत आणि त्यानंतर पुढील मोहिमेवर जात असत. त्यांना आपल्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही नेते व नागरिक आपल्या  जमिनी विकून आर्थिक मदतीचा हात पुढे करीत होते. देशातील नागरिकांकडून सुरू  असलेले हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी ब्रिटीश सरकार आंदोलन करणारे नेते व नागरिकांना गोळीबार करून ठार मारीत होते. पंजाब येथील जालियनवाला बागेमध्ये आंदोलकांची जाहीर सभा भरविण्यात आली होती. त्या सभेमध्ये ब्रिटीश सैनिकांनी बेछूट गोळीबार करून हजारो आंदोलकांना ठार मारले, हा इतिहास देशातील प्रत्येक नागरिकाला ज्ञात आहे.
सन 1857 ते सन 1947 अशी 90 वर्षे आपला स्वातंत्र्यासाठी संघर्ष चालूच होता. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटीशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. आपले सरकार सत्तेवर आले आणि आंदोलन करणारे नेते व कार्यकर्त्यांना जेलमधून सोडणार म्हणून संपूर्ण देशाने जल्लोष व आनंदोत्सव साजरा करीत होते. ब्रिटीश सरकारच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांना सरकार ‘स्वातंत्र्य सैनिक’ म्हणून जेलमधून सन्मानाने मुक्त करणार असल्याची वार्ता संपूर्ण देशात पसरली. या स्वातंत्र्य सैनिकांचे त्या-त्या गावातील ग्रामस्थ मोठ्या जल्लोषात स्वागत करणार असल्याचे एक दिवस आधी समजले. माझे गाव नूल, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर. माझ्या गावातील सारे गावकरी एकत्र येऊन स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वागताची जय्यत तयारी करीत होते. त्यावेळी माझे वय होते अवघे सात वर्षाचे. मी माझ्या मोठ्या भावाबरोबर या कार्यात सहभागी झालो होतो. सारे गावकरी झटून स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वागताच्या तयारीला लागले होते.
स्वातंत्र्य सैनिकांना गावातील ज्या रस्त्याने गावात सन्मानाने आणावयाचे होते, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खड्डे खोदून त्या खड्ड्यामध्ये झाडांच्या फांद्या रोऊन त्यांची आकर्षक पध्दतीची आरास तयार करण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी त्या रस्त्यावरून ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर आहे, त्या ठिकाणी या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे जंगी स्वागत केले आणि ज्यांचे अद्याप लग्न झाले नव्हते त्यांना गावातल्या मुली देऊन त्यांचे लग्न लावून दिले अशा पध्दतीने हा सामूहिक विवाहसोहळा आनंदोत्सव पार पडला. हे स्वातंत्र्य सैनिक आपण केलेल्या कार्याची कर्मकहाणी आम्हाला सांगत होते. त्यामुळे माझ्या बालमनात त्यावेळेपासून आपणही देशसेवा करावी ही वृत्ती लहानणापासूनच अंगी रुजली.
मी भारतीय सैन्य दलात सन 1962 मध्ये भरती झालो. त्यावेळी भारताची चीनसोबतच्या युध्दाला सुरुवात झाली होती. आम्हाला जबलपूर या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर सन 1964 मध्ये पंजाबमधील पटियाला या ठिकाणी मी बदलीवर आलो आणि सन 1965 मध्ये भारत पाकिस्तान युध्दाला सुरुवात झाली. हे युध्द कोणत्याही परिस्थितीत आपण जिंकायचेच, या निर्धाराने आम्ही सारे सैनिकदल कामाला लागलो. अमेरिकेकडून पॅटन रणगाड्यांसारखी अत्याधुनिक यंत्रसामुग्री, शस्त्रसाठा घेऊन पाकिस्तान आपल्यावर चाल करून आला होता. या युध्दाची सुरुवात दि. 6 सप्टेंबर 1965 रोजी सुरू होऊन दि.23 सप्टेंबर 1965 रोजी थांबली. या 18 दिवसांत पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते.
अमेरिकेने पाकिस्तानला पुरविलेले अत्याधुनिक पॅटन रणगाड्यांचा भारताने बुक्का करून टाकला आणि भारताचा विजय संपूर्ण जगात पसरला. तेव्हा आपल्या भारताची ताकद काय आहे हे संपूर्ण जगाला समजले. युनोमध्ये शांतता कमिटीवर आपल्या भारताचा एक प्रतिनीधी घेतला गेला. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचा हा पहिला विजय आहे. अमेरिकेला हे सहन झाले नाही. अमेरिकेने पुन्हा कुबड्या देऊन पाकिस्तानला उभे केले. अमेरिकेने सन 1971 मध्ये पश्चिम पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) आणि पूर्व पाकिस्तान (आताचा बांग्लादेश) यांच्यामध्ये संघर्ष लावून दिला. त्यांच्या मदतीसाठी म्हणून अमेरिकेने तेव्हा सातवे आरमार सर्वात मोठे जहाज भरून आधुनिक हत्यारे व यंत्रसामुग्री पाकिस्तानला पुरविली होती. पाकिस्तानला मदतीचा हात देऊन अमेरिका सन 1965 चा भारतावरील सूड घ्यायचा होता. परंतु जनरल माणिक शॉ यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि कौशल्याच्या बळावर आपण अमेरिकेचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि युध्द जिंकून बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा भारताचा स्वातंत्र्यानंतरचा दुसरा मोठा विजय झाला.
अशा पध्दतीने भारतीय सैनिकांनी सन 1962 मध्ये भारत-चीन सन 1965 मध्ये भारत – पकिस्तान, सन 1971 मध्ये भारत – बांग्लादेश आणि सन 1997-98 मध्ये कारगील अशी चार युध्दे जिंकत भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखले आहे. याचा आम्हाला एक सैनिक म्हणून प्रचंड अभिमान वाटतो. स्वातंत्र्य सैनिकांनी आपले अखंड आयुष्य देशासाठी अर्पण केले. सतत संघर्ष केला, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि भारतीय सैनिकांनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवित ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button