ना. उदय सामंत राज्याचे उद्योगमंत्री
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना भाजप युती सरकाराचा गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, खाते वाटप झाले नव्हते. अखेर रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मान्यतेनंतर अधिकृत घोषणा करण्यात आली. रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, रत्नागिरीचे सुपुत्र उदय सामंत यांची राज्याच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्रिपदी वर्णी लागली आहे. रविवारी संध्याकाळी मंत्री खाते वाटप जाहीर करण्यात आले. उदय सामंत उद्योग मंत्री झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती येणार असून उद्योग क्षेत्रात अनेक चांगले बदल घडतील, नवीन उद्योग येण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशा प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटू लागले आहे. ना. सामंत यांना उद्योगमंत्रिपद जाहीर होताच रत्नागिरीत त्यांच्या समर्थक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.