रत्नागिरी मारुती मंदिरच्या शिवसृष्टीचे 14 रोजी लोकार्पण; छत्रपती संभाजीराजांसह ना. उदय सामंत यांची उपस्थिती
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर चौकात उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
मारुती मंदिर सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभिकरण हाती घेण्यात आले होते. ना. सामंत यांनी यात विशेष लक्ष घातले. त्यासाठी त्यांनी मुंबईतील नामांकित जे. जे. स्कूल ऑफ आर्टस कॉलेजच्या वरिष्ठ प्राध्यापकांशी चर्चा केली आणि त्यातून नवनव्या कल्पना साकारल्या आहेत. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे 20 विद्यार्थी गेले आठ-नऊ महिने हे काम करत होते. आता हे काम पूर्णत्वाला आले आहे. येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास 4 घोडेस्वार, 2 हत्ती, मावळे, 4 तोफा अशी शिवसृष्टी मारुती मंदिर चौकात उभारण्यात आली आहे. या भागात रायगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे चार किल्ल्यांच्या छोट्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.