
सावंतवाडी शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच
सावंतवाडी : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. शहरातील सर्वोदयनगर येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या तसेच 20 हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. तर लगतच्या माजगाव -हरसावंतवाडा येथे श्रीराम बोअरवेलचे कार्यालय फोडून आतील सीसीटीव्ही फुटेजचा रिसिव्हर चोरून नेला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील चोरी झाल्या प्रकरणी घर मालकाला पोलिसांनी पाचारण केले असून चोरीस गेलेल्या मुद्देमालची शाहानिशा करून मगच गुन्हा दाखल केला जाणार आहे.
सावंतवाडी शहरात चोर्यांचे सत्र सुरूच आहेत. शहरात घरफोड्यांचे प्रकार वाढत असून बॅटर्या, कारच्या व्हील कॅपची चोरी करण्यापर्यंत चोरटे सोकावले आहेत. पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढवल्यानंतरही चोरीचे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शहरातील अगदी गजबजलेले ठिकाण असलेल्या सर्वोदयनगरमधील बंद घराला चोरट्यानी लक्ष्य केले. हे घर गेले काही दिवस बंद होते. घराचे मालक प्रमोद नारकर हे कामानिमित्त मुंबई येथे असल्यामुळे घर बंद होते.
सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी घर फोडले. दरवाजाची कडी कोयंडा उचकटून काढून आत प्रवेश करीत चोरट्यांनी खोलीतील कपाटाला लावलेल्या चाव्या घेऊन लॉकरमध्ये ठेवलेले वीस हजार रुपये व सोन्याच्या दोन बांगड्या असा मुद्देमाल लंपास केला. नारकर हे भाड्याने या ठिकाणी राहत आहेत. त्यानंतर चोरट्यानी आपला मोर्चा माजगाव- हरसावंतवाडा येथे श्रीराम बोअरवेलच्या कार्यालयाकडे वळवला. कार्यालयाच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही रिसिव्हर चोरून नेला. श्रीराम बोअरवेलचे मालक पाटील यांनी सिसीटीव्ही फुटेज तपासले असता मध्यरात्री 2.15 वा. च्या सुमारास ही चोरी झाल्याचे दिसून आलेे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घरमालक नेरकर यांना पोलिस ठाण्यात बोलावले आहे. नेमका मुद्देमाल चोरीस गेला का याची शहानिशा पोलिस करणार आहेत. वस्तुस्थिती वरून चोरीची पडताळणी केली जाणार आहे. घटनास्थळी श्वानपाथकांला पाचारण करण्यात आले असून चोरट्याचा मागमूस लागला नाही.