
रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 522 कोटींचा निधी
रत्नागिरी : रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षीपासून सुरु करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी 522 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली. दिल्ली येथे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री उदय सामंत यांनी दिली. ऑनलाइन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याबाबत बोलताना ना. सामंत म्हणाले, नवीन इमारतीसाठी 114 कोटी 77 लाख, यंत्रसामुग्रीसाठी 120 कोटी असे 259 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचार्यांच्या वेतनापोटी तीन वर्षासाठी 105 कोटी रुपये, 31 कोटी आवर्ती खर्च व अन्य मिळून एकूण 522 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत तीन वर्षात पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचेही ना. सामंत म्हणाले. जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व मनोरुग्णालय इमारत आवारात हे शासकीय महाविद्यालय सुरु केले जाणार आहे. मनोरुग्णालयाची सुमारे 14 एकर जागा असून त्यातील चार एकर जागेत नुतन इमारत व हॉस्टेलची उभारणी केली जाणार आहे. यासाठी आवश्यक 20 एकर जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व मनोरुग्णालय इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीसाठी 25 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळात हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल ना. सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.