भडे ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी पूर्णांगिनीच्या हस्ते होणार ध्वजारोहण
रत्नागिरी : अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेमार्फत विधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी पूर्णांगिनी सन्मान कार्यक्रम काही दिवसांपूर्वी घेतला होता. कोणत्याही शुभ कार्यात या महिलांना सहभागी करुन घ्या असे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले होते. आवाहनाला प्रतिसाद देत येथील भडे ग्रामपंचायतीने 15 ऑगस्ट रोजी पूर्णांगिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व ग्रामस्थांनी केले आहे. विधवांना सन्मानाने जगता यावे, अनिष्ट प्रथा बांद व्हावेत याहेतूने विधवा प्रथा बंदीची अंमलबजावणी राज्यात सगळीकडे सुरु झाली. केवळ प्रथा बंद करुन उपयोग नाही तर प्रत्यक्षात विधवांना कौटुंबिक, सामाजिक शुभकार्यात सक्रिय सहभागाचा हक्क मिळावा यासाठी अनुसयाने सर्व पूर्णांगिनींना एकत्र आणून त्यांच्याहस्ते हळदीकुंकू लावले होते. यावेळी कार्यक्रमाला भडे ग्रामपंचायतीचे सरपंच वगैरे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यानंतर जिल्हाभरात याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आवाहन करण्यात आले होते. याची सुरुवात भडे ग्रामपंचायतीने केले. या ग्रामपंचायतीचे अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेकडून आभार मानण्यात आले आहे.