परशुराम देवस्थान : महामार्ग भूसंपादन मोबदल्यावर तोडगा निघण्याची शक्यता
चिपळूण : चिपळूण-परशुराम देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्यामधील महामार्ग भूसंपादन मोबदल्याबाबत सुरु असलेल्या वादासंदर्भात उच्च न्यायालयाचे वकील अॅड. ओवेस पेचकर यांनी परशुराम देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजू जोशी यांची मुंबई येथे भेट घेतली आणि या प्रकरणी जिल्हा न्यायाधीशांच्या उपस्थितीत लवकरच सर्वानुमते तोडगा काढण्याचा निर्णय झाला.
मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे, परशुराम येथील जमिनीचा मोबदला वाद कोर्टात प्रलंबित आहे. याबाबत अनेकवेळा बैठका झाल्या. मात्र त्याला यश आले नाही. शासनाने दिलेल्या मोबदल्याची 43 कोटींची रक्कम आजही पडून आहे. या संदर्भात गग्रामस्थांच्या वतीने अॅड. ओवेस पेचकर हा लढा लढत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच परशुराम देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजू जोशी यांच्या मुंबई येथील निवासस्थानी अॅड. पेचकर यांनी भेट घेतली. या विषयावर दोघांनीही सकारात्मक चर्चा करून जमिनीची मालकी देवस्थान, खोत की कुळ हा प्रश्न तूर्तास थांबवून आलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेबाबत दोन्ही बाजूनी चर्चा करून मार्ग काढू असे ठरवले. तसा एक प्रस्ताव ग्रामस्थ्यांच्यावतीने द्या, मीही इतर विश्वस्तांजवळ बोलतो असे श्री. जोशी यांनी आश्वासन दिले. याबरोबरच 1975 पासून सुरु असलेल्या रेल्वे, जुना महामार्ग, एमआयडीसी आदी सर्व वादासाठी सन्माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्या मध्यस्तीमध्ये हा विषय ठेऊन तिथे हा संपूर्ण विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली. यासाठी दोन्ही बाजूने लवकरच तसा प्रस्ताव देण्याचे ठरवण्यात आले.