
चिपळुणातील बीएसएनएल कार्यालय आवारातून गाडीची चोरी
चिपळूण : शहरातील बीएसएनएल ऑफिस आवारामधून साडेचार लाख रूपये किमतीची बोलेरो गाडीची चोरी झाली आहे. या प्रकरणी सुहास कदम (रा. दुर्गवाडी) यांच्याविरूद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चंदर शेट्ये (बीएसएनएल ऑफीसमध्ये सुपरवायजर ) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 25 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यानुसार सुहास कदम हा बीएसएनएलच्या नऊ गाड्यांपैकी बोलेरो गाडी क्र. एमएच-07-पी-3437 या गाडीवर चालक म्हणून नोव्हेंबर 2021 पासून संजीव नेरळकर यांनी कामाला ठेवले होते. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गाडी चालविण्याची त्यांची ड्युटी होती. चिपळूण येथील कार्यालयात ही गाडी होती. दि. 25 जून रोजी सायंकाळी 6 वा. रवींद्र कृष्णा कदम यांना ही गाडी कार्यालयाजवळ दिसून आली नाही म्हणून त्यांनी याबाबतची माहिती अशोक शेट्ये यांना कळविली. सुहास कदम याने कंपनीच्या ताब्यातील गाडी संमतीशिवाय चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.