
जगबुडी, नारिंगी नदी धोक्याच्या पातळीवर
खेड : मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीसह सर्वच नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. तालुक्यात मंगळवारी दि. ९ रोजी सकाळी ८ पर्यंत एकूण १९०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
खेड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी दि. ९ रोजी देखील पाऊस विश्रांती न घेता कोसळत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. सायंकाळी ४ नंतर देखील जगबुडी व नारिंगी या दोन मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सलग चोवीस तास उलटून गेले तरी जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. चोवीस तासात ११२मिलीमीटर पाऊस पडला आहे. नदी किनार्यालगतचा भाग पुराच्या पाण्यात असून आणखी काही तास अशीच परिस्थिती राहिल्यास नदी किनार्यावरील शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.