
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकरआर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर!
मुंबई : फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या दोन प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असलेल्या पुरुषोत्तम चव्हाण यांच्याकडून त्यांच्या बँक खात्यात २.६४ कोटी रुपये मिळाल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर आता आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) रडारवर आल्या आहेत.
ईओडब्ल्यूच्या सूत्रांनुसार, २०१७ ते २०१८ दरम्यान ९० दिवसांच्या कालावधीत हे पैसे हस्तांतरित करण्यात आले. तपासकर्त्यांना असे आढळून आले की, करंदीकर यांनी नंतर ही रक्कम इंट्राडे शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवली परंतु त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिस महासंचालकांना (डीजीपी) पत्र लिहून करंदीकर यांनी त्यांच्या अनिवार्य मालमत्तेच्या खुलाशात एक सेवारत पोलीस अधिकारी म्हणून मोठ्या व्यवहाराची घोषणा केली होती का? हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
करंदीकर यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नसले तरी, ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांनी विशेष कोटा वाटपाच्या नावाखाली सवलतीच्या दरात फ्लॅट आणि सरकारी जमीन देण्याचे खोटे आश्वासन देऊन किमान २० व्यक्तींना २४.७८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या कथित घोटाळ्यात मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल यासारख्या प्रमुख ठिकाणांचा आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) च्या मालकीच्या भूखंडांचा समावेश आहे.