हॉस्पिटलचे कारण सांगून बालकांना मुंबईत घेऊन जाणाऱ्या दोघा महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
गुहागर : मौजे अंजनवेल येथून बेपत्ता ३ अल्पवयीन मुलींना १२ तासात शोधण्यास गुहागर पोलिसांना यश आले आहे. मुंबई येथून त्यांना ताब्यात घेतले आहे.
दि . ५ ऑगस्ट २०२२ रोजी गुहागर तालुक्यातील अरमारकर मोहल्ला , अंजनवेल येथील राहणारी सौ. गजाला फैयाज महालदार यांच्या ३ अल्पवयीन मुली (प्रत्येकी वय १७ वर्षे , १३ वर्षे , ११ वर्षे) यांना मोहल्यात राहणा-या अफिया सुलतान अन्सारी व अरविना सुफियार पांजरी या महिलांनी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास, आम्हाला अंजनवेल येथील डॉक्टरांकडे जायचे असल्याचे सांगून सौ. गजाला यांच्या ३ मुलींना सोबत घेऊन गेल्या. मात्र तीनही अल्पवयीन मुली परत न आल्याने मोहल्यात व इतरत्र शोध घेतला. तसेच डॉक्टरांकडेही चौकशी केली तेव्हा या महिला व मुली हॉस्पीटलमध्ये गेल्या नसल्याचे समजले.
सौ.गजाला महालदार यांनी रात्री १२.०० वाजेपर्यंत वाट पाहून आपल्या अल्पवयीन मुली घरी परत आलेल्या नसल्याने व सदर दोन्ही महिलांशी संपर्क क्रमांक बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता . त्यावेळी ३ मुलींसोबत असलेल्या दोन्ही महिलांचे स्वतःची प्रत्येकी २ मुले असे एकूण ४ मुले अनुक्रमे वय ९ वर्षे , ६ वर्षे , १ वर्षे , १ महिना या सुध्दा त्यांच्यासमवेत असल्याचे समजले . सदर माहिती गुहागर पोलीसांना प्राप्त होताच सदर घटनेत एकूण ७ बालके व २ महिला बेपत्ता असल्याचे गंभीर बाब निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस ठाण्याचे २ अधिकारी व ८ अंमलदार यांची ४ पथके तयार केली , प्रत्येक पथकाला १ ) दापोली , २ ) दाभोळ , ३ ) चिपळूण , ४ ) मुंबई येथे वेगवेगळी कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी सोपवली .
घटनेच्या गांभीर्याप्रमाणे विलंब न करता सविस्तर तपास केला. सदर महिला या सर्व बालकांसहित मुंबईच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याने त्याप्रमाणे वेळ न घालवता पोलिस उप निरीक्षक कांबळे यांच्या पथकाला तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले होते. इतर पथकाने केलेल्या तपासामध्ये सदरच्या महिला व ७ बालके हे मुंबईच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. गुहागर पोलिसांनी सदर दोन्ही महिला व ७ बालके यांना दादर येथून सुखरुपरित्या ताब्यात घेतले आहे . सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग , अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई , उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक पवन कांबळे , पोलिस हेड कॉन्स्टेबल हनुमंत नलावडे , पोलिस नाईक राजेश धनावडे , पोलिस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ , टॅबचे रमिझ शेख यांच्या पथकाने केले आहे . सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते हे करत आहेत.