गुहागरमध्ये नांगरणी स्पर्धा आयोजित करणाऱ्यावर गुन्हा दाखल
गुहागर : काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भात लावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यासाठी परवानगी न घेतल्यामुळे आणि स्पर्धेदरम्यान प्राण्यांना निर्दयपणे वागणूक दिली जात असल्याचे कारण देत एकाने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर तावडे असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबची तक्रार मनोहर चाळके (सती चिंचघरी, चिपळूण) यांनी गुहागर पोलीस स्थानकात दिली. 5 ऑगस्ट रोजी झोंबडी येथे काळभैरव मंडळातर्फे भात लावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन समीर तावडे यांनी केले होते. स्पर्धेत 50 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी अनेक राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. या स्पर्धेदरम्यान सहभाग घेण्यावरुन स्पर्धकांमध्येच वाद उफाळून आला. वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र याचवेळी स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून आलेले मनोहर चाळके यांनी आयोजक समीर तावडे यांना प्रश्न विचारला. स्पर्धेसाठी शासनाची आवश्यक परवानगी घेतली का? मात्र याचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चाळके यांनी चिपळूण पोलीस स्थानकात संपर्क साधला. चिपळूणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चाळके यांची तक्रार ऐकल्यानंतर पोलीस चाळकेंना घेऊन गुहागर पोलीस स्थानकात आले. या पोलीस स्थानकात मनोहर चाळके यांनी समीर तावडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
या तक्रारीत चाळके यांनी म्हटले आहे की, शासनाची परवानगी न घेता, मनाई आदेश धुडकावून नांगरणी स्पर्धेचे आयोजन समीर तावडे यांनी केले होते. याद्वारे बैलांना नांगरासह चिखलात त्रास होईल, अशा पध्दतीने पळण्यासाठी मैदान तयार करण्यात आले होते. बैलांना नागराला जुंपून यातना होतील अशा पध्दतीने पळवण्यात आले. असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी प्राण्यांना निर्दयपणे वागवणे या प्रतिबंधात्मक अधिनियमाखाली समीर तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.