अमरावती कारागृहातून पलायन करणार्‍या कुविख्यात गुन्हेगाराला रत्नागिरीत पाठलाग करत ठोकल्या बेड्या

रत्नागिरी : शिक्षा भोगत असताना अमरावती कारागृहातून पलायन करणार्‍या गुन्हेगार साहील अजमत काळसेकर (रा. मूळ, रा. नायशी, ता . चिपळूण) याला रत्नागिरी शहर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी शहरातील उद्यमनगर येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या साहीलची पोलीस पथकाशी झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा त्याच्यावर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अमरावती कारागृहात शिक्षा भोगत असताना दि. २८ जून रोजी रात्रीच्या सुमारास तीन कैद्यांनी कारागृहातून पलायन केले होते. त्यामध्ये चिपळूण नायशीमधील अजमत काळसेकर याचा समावेश होता. साहील मूळचा रत्नागिरीचा असल्याने त्याला शोधण्याची जबाबदारी रत्नागिरी पोलिसांवर देण्यात आली होती.
शनिवारी सायंकाळी साहील शहरातील उद्यमनगर परिसरात आला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस हवालदार प्रवीण बर्गे , पोलिस नाईक गणेश सावंत , पोलिस नाईक आशिष भालेकर , पोलिस नाईक पंकज पडेलकर यांना सायंकाळी उद्यमनगर एमआयडीसी येथील शेट्येनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका टपरीवर आरोपी साहील काळसेकर उभा असलेला दिसून आला. त्याचा दिशेने जात असताना, तो पोलिसांना पाहून पळू लागला. त्यावेळी त्याने टपरीच्यामागे असणार्‍या गडग्यावरून उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलीस साहीलचा पाठलाग करताना साहील काळसेकर हा पुढील एका गडग्यावरून उडी मारत असताना गडग्याला धडकून पडला. यावेळी त्याची पोलिसांशी झटापट झाली. अखेर पोलीस पथकाने त्याला पळत जाऊन पकडले. तेव्हा साहीलने हाताला हिसका देऊन ढकलून आरडोओरडा करत शिवीगाळ करून, मोठमोठ्याने वाद घालून लाथा झाडून, झटापट करुन स्वत:ला सोडवून घेतले व पुन्हा पळू लागला. त्यानंतर पोलीस पथकाने पुन्हा त्याचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर सदर पोलिस पथकामध्ये असलेले प्रविण बर्गे , आशिष भालेकर , पंकज पडेलकर यांनी त्याला झडप घालून पकडले. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक गणेश सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. साहीलकडून ताब्यात घेण्यात आलेली पल्सर मोटार सायकल ही चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याबाबत राबोडी पोलीस ठाणे, जि. ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी साहील अजमत काळसेकर हा जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यात खून , खुनाचा प्रयत्न, घरफोडी , चोरी , सरकारी नोकरारा हरकत , गर्दी मारामारी, आत्महत्येचा प्रयत्न , तसेच रखवालीतून पळून जाणे असे एकूण ३६ गुन्हे दाखल असून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो शिक्षा भोगत असताना अमरावती कारागृहातून पळाला होता. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उप विभागीय पोलीस अधिकरी सदाशिव वाघमारे , पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली , सहायक पोलिस निरीक्षक मनोज भोसले , प्रविण बर्गे , गणेश सावंत , आशिष मालेकर , पंकज पडेलकर यांनी केली. या गुन्ह्याचा तपास सपोनि मनोज भोसले करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button