संगमेश्वर तालुक्यातून सातारा जिल्हा जोडण्यासाठी हालचाली, संगमेश्‍वर- नायरी- निवळी या घाटमार्गाचा आराखडा तयार करणार

संगमेश्‍वर : तालुक्यातून सातारा जिल्हा जोडणे शक्य आहे. संगमेश्‍वर-नायरी-निवळी या घाटमार्गाच्या कामाला गती मिळावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी माजी मंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेऊन लक्ष देण्याची विनंती केली होती. त्यानुसार या मार्गाचा नव्याने आराखडा व अहवाल तयार करण्याचे निर्देश माजी मंत्री उदय सामंत यांनी दिले आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग ते संगमेश्वर-कसबा-कारभाटले-नायरी-निवळी- नेरदवाडी येथून सुरू होणारा घाट पाटण तालुक्यातील मळे, कोळणे या ठिकाणी जोडला जातो. येत्या दोन महिन्यांत डीपीआरचे काम पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाला मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.
परिसरातील गावांमधील लाखो नागरिकांना या मार्गाचा फायदा होणार असून पुणे, सातारा या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे हे काम 2023 पर्यंत सुरू होईल, असे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून पाठपुरावा आवश्यक आहे. यासाठी माजी मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे येडगे यांनी यावेळी सांगितले.
संगमेश्वर-नायरी-निवळी घाटमार्गाच्या कामाचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 1999 साली भूमिपूजन करण्यात आले होते. पाचांबे नेरदवाडी येथे भूमिपूजन झाल्यानंतर वनविभागाची परवानगी नसल्याने तांत्रिक अडथळे निर्माण झाले होते. त्यानंतर या कामासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात आला नव्हता. आता या कामासाठी माजी मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधल्याने आणि ना. सामंत यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.
तांत्रिक अडथळे दूर करून या रस्त्याचे काम माजी मंत्री उदय सामंत मार्गी लावतील, असा विश्वास संतोष येडगे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button