रत्नागिरी विमानतळ : महाराष्ट्र राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून द्यावी, खा. राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर
रत्नागिरी : रत्नागिरीचे विमानतळ सुरु करण्याबाबत सरकारने कोणती पावले उचलली आहेत? याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी अधिवेशनामध्ये लेखी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सिव्हील टर्मीनल भवन, समांतर टॅक्सी ट्रॅक, नेव्हीगेशन सेंटर या करिता महाराष्ट्र राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
शिवसेना सचिव तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी अधिवेशनात रत्नागिरी विमानतळ नागरी यात्रा सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे तर तो सुरु करण्यास विलंब का होतोय? याबाबत नागरी विमान राज्यमंत्री ना. डॉ.विजयकुमार सिंह यांना लिखीत स्वरूपात प्रश्न विचारला होता.
यावेळी उत्तर देताना रत्नागिरी विमानतळ हा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिन असून उडान सेवेअंतर्गत या विमानतळाचा समावेश आहे. येथील विमानतळाचा स्तर उंचावणे आवश्यक असून अत्यावश्यक सिव्हील टर्मीनल भवन, समांतर टॅक्सी ट्रॅक, नेव्हीगेशन सेंटर या करीता महाराष्ट्र राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची माहिती दिली. येथील विमानतळ लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचेही खा. राऊत यांनी स्पष्ट केले आहे.