राष्ट्रवादीकडून उबाठा शिवसेना नेत्यांच्या फोटोचा गैरवापर

निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; चिपळुणात खळबळ


*चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिमांचा परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लेखी अर्जाद्वारे सादर करण्यात आली.

शिवसेनेच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या काही उमेदवारांकडून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तसेच शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत यांच्या प्रतिमांचा विनापरवाना प्रचारात वापर केला जात आहे. हा प्रकार खोडसाळ, दिशाभूल करणारा असून निवडणूक आचारसंहितेचे थेट उल्लंघन असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

शिवसेनेने स्पष्ट केले आहे की चिपळूण नगर परिषद निवडणूक २०२५ साठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात कोणतीही आघाडी किंवा अधिकृत युती नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असताना शिवसेना नेत्यांचे फोटो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर गैरव्यवहाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी शिवसेनेकडून निवडणूक अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

हा अर्ज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर आणि शहर प्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम यांच्या स्वाक्षरीसह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.

चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तक्रारीमुळे स्थानिक राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button