
चिपळूण गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांची कर्मचाऱ्यांनी घेतली धास्ती
चिपळूण पंचायत समितीच्या नुकत्याच हजर झालेल्या गटविकास अधिकार्यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना धक्का दिला आहे. त्यांच्या या धक्कातंत्राचा अनेकांनी धसका घेतला असून आता अनेकजण कार्यालयात वेळेवर येत आहेत तर काहींनी चक्क रोज डबा आणण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील लोक विविध कामांसाठी पंचायत समितीत येत असतात. मात्र पंचायत समितीच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नाहीत. याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत आहेत. याची दखल घेत गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांनी पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. तशी नोटीस सर्व विभागांना देण्यात आली असून यात कुचराई केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पं. स.मधील ग्रामपंचायत, बांधकाम, पाणी पुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, महिला बालकल्याण, आरोग्य आदी विभागातील विविध कामांसाठी तालुक्यातील ग्रामस्थांची नियमीतपणे ये-जा सुरू असते. सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:30 पर्यंत कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचार्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी वेळेत उपस्थित राहतात. मात्र काही अधिकारी व कर्मचार्यांना वेळेचे बंधन राहिलेले नाही. कितीही गटविकास अधिकारी आले तरी बेशिस्त कर्मचार्यांनी आपला पायंडा मोडलेला नाही. दुपारी घरी जेवायला गेलेले हे कर्मचारी बिनधास्तपणे आपल्या वेळेनुसार कार्यालयात उपस्थीत राहतात. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी आलेले ग्रामस्थ अधिकारी व कर्मचार्यांची वाट पाहत बसतात. परिणामी त्याच दिवशी काम न झाल्यास पुन्हा त्यांना पं.स.चे उंबरठेे झिजवावे लागतात. अलिकडेच पंचायत समितीचा कारभार स्विकारलेल्या गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांना त्याची गंभीरपणे दखल घेतली आहे.