घर घर तिरंगा या अभियानाने जनमानसात राष्ट्रभक्तीचा सागर उसळतो आहे. तिरंगा फडकवण्यासाठी प्रचंड आतुरता दिसून येते – ॲड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये आज घर तिरंगा अभियानाची सुरुवात घराघरात जाऊन तिरंगा सन्मानपूर्वक प्रदान करून करण्यात आली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सन्मानाने तिरंगा स्विकारला व मोदीजींनी घराघरात तिरंगा फडकवण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद दिले.
आपल्याला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याबाबत नागरिक प्रचंड उत्सुक आहेत. ७५ वर्षांपूर्वी प्राप्त झालेले स्वातंत्र्य मौल्यवान असून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या थोर देशभक्त विभूतींच्या आठवणी या अभियानामुळे जनमानसात तीव्रतेने जाग्या होत असल्याचे प्रत्यंतर येते. देशाच्या सार्वभौमत्वेचे प्रतीक असलेला अशोक चक्रांकित तिरंगा लहान थोर सर्वांसाठी प्रिय असून राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेला हा तिरंगा आपल्या घरावर फडकवण्यासाठी जनमानस कमालीचे आतुर असल्याचा अनुभव तिरंगा प्रदान करताना घरोघरी फिरताना आला. असे ॲड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
तिरंगा ध्वजासंदर्भातील ध्वज संहिता शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून १३ ऑगस्ट सूर्योदयानंतर तिरंगा आपल्या घरावर, कार्यालयावर फडकवण्याची व १५ ऑगस्ट सूर्यास्तापर्यंत तो न उतरवता तसाच ठेवण्याची मुभा सर्व नागरिकांना प्राप्त झाली आहे. नागरिकांनी घरावर तिरंगा फडकवताना तिरंग्यातील भगवा रंग वरच्या बाजूला राहील या पद्धतीने तिरंगा फडकवावा. तिरंग्याचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. पावसामुळे तिरंगा भिजला तरी अडचण नाही. मात्र तिरंगा फाटणार नाही, त्यावर डाग पडणार नाही याची उचित काळजी घ्यावी. तसेच तिरंग्यापेक्षा उंच अन्य ध्वज असणार नाही याची काळजी घेऊन तिरंगा फडकवण्याची मुभा आहे.
संपूर्ण शहरातील प्रत्येक घरावर, प्रत्येक आस्थापनेमध्ये दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवलेला असेल हे दृश्य राष्ट्रभक्तीचे विहंगम दृश्य असेल अशी प्रतिक्रिया भा.ज.पा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये घराघरात जाऊन ध्वज प्रदान करण्याचा उपक्रम श्री.राजू कीर यांनी आयोजित केला. त्याप्रसंगी श्री.विक्रांत जैन, श्री.मोहन पटवर्धन, श्री.अतुल लेले, श्री.वैशंपायन, श्री.गोडबोले, श्री.शेखर लेले, श्री.राजन फाळके, श्री.दादा ढेकणे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.