रत्नागिरी शहरातील शाळांमध्ये पोषण आहार वाटपात गोंधळ
रत्नागिरी : शहरातील शाळांना दुपारच्या सुट्टीत देण्यात येणार्या पोषण आहार वाटपातील गोंधळ तिसर्या दिवशीही कायम असून बुधवारी पालिकेच्या दामले विद्यालयात दुपारची सुट्टी संपून गेल्यानंतर पोषण आहार आल्याने विद्यार्थी भुकेने व्याकुळ झाले होते. उशिरा आलेला पोषण आहारही अपुरा असल्याने अनेक विद्यार्थी आहारापासून वंचित राहिले. ते उशिरापर्यंत आहाराची प्रतीक्षा करत होते.
संस्कार महिला मंडळ संस्थेकडून तब्बल दुसर्यांदा हा प्रकार झाल्याने त्यांच्यावर करवाई करण्याचा इशारा पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी दिला आहे.
रत्नागिरी शहरातील सर्व शाळांना शालेय पोषण आहार वाटपासाठी तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत सोमवारी दि.1 ऑगस्टपासून शालेय पोषण आहार वाटपाचे काम सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी संस्कार महिला मंडळामार्फत रा.भा.शिर्के प्रशालेत विद्यार्थ्यांना कच्चा भात दिल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे पालकांसह संस्था चालक आक्रमक झाले होते.
शहरातील दामले विद्यालयात संस्कार महिला मंडळ शाहुवाडी, कोल्हापूर या संस्थेमार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. शाळेला दोन दिवस सुट्टी असल्याने बुधवारी पोषण आहार पुरविण्याचा या शाळेत संस्थेचा पहिलाच दिवस होता. दुपारी 1.20 वाजता शाळेची सुट्टी सुरू झाली. त्यापूर्वी शाळेत पोषण आहार पोहोचणे अपेक्षित होते. मात्र सुट्टी संपली तरीही शाळेत पोषण आहार पोहोचला नाही. तर दुसरीकडे चिमुकले विद्यार्थी भुकेने व्याकुळ झाले होते. पोषण आहार मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी घरातून डब्बे आणले नव्हते. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उपाशी पोटी राहावे लागले. तर दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास आहार आला. मात्र तो अपुरा असल्याने अनेक विद्यार्थ्यांना उपाशीच राहावे लागले.
या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी तत्काळ दामले विद्यालयात धाव घेतली होती. त्यांनी संस्थेला तत्काळ आहार पुरविण्याची सूचना केली. मात्र अपुर्या आहारामुळे अनेक विद्यार्थी वंचित राहिल्याने संस्कार महिला मंडळ संस्थेवर कारवाई करण्याचा इशारा सुनील पाटील यांनी दिला
आहे.