
रत्नागिरीत आमदार उदय सामंत समर्थकांनी केला भ्याड हल्ल्याचा निषेध
रत्नागिरी : आ. उदय सामंत यांच्यावरील हल्ल्यानंतर रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. भ्याड हल्ला करणार्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यापुढेही दौर्यादरम्यान अशा स्वरुपाच्या घटना घडू नयेत, यासाठी गृह विभागाने काळजी घ्यावी व सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणीही पदाधिकार्यांनी केली. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका… आमदार सामंत आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा देत आ. उदय सामंत यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचा रत्नागिरीत निषेध करण्यात आला. आ. सामंत यांच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते यावेळी आक्रमक झाले होते.
माजी मंत्री व रत्नागिरीचे आ. उदय सामंत हे मंगळवारी पुणे येथे असताना कात्रज चौकात त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. रत्नागिरीमध्ये या घटनेचे वृत्त समजताच, आ. सामंत यांच्या सहकार्यांमधून निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील विविध भागात, अगदी स्कायवॉकवरतीही निषेधाचे व आ. सामंतांच्या पाठिंब्याचे बॅनर झळकत होते.
बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून आ. सामंत यांच्या जयस्तंभ येथील कार्यालयाबाहेर समर्थक जमले. रत्नागिरी पोलिसांनीही मोठा बंदोबस्त ठेवला होता. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बिपीन बंदरकर, माजी युवा तालुकाधिकारी तुषार साळवी, राजन शेट्ये, जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाटील, बाळू साळवी, अल्ताफ संगमेश्वरी, सौ. स्मितल पावसकर, सौ. कांचन नागवेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.